सोलापूर : विजेचा तीव्र शॉक लागल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील आंबे गावच्या शेतकरी दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीला विजेचा धक्का लागल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पत्नीलाही आपला जीव गमवावा लागला आहे. या काळीज हेलावणार्या घटनेमुळे आंबे गावावर आणि संपूर्ण परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे. लक्ष्मण बाबू नागणे (वय ६०) आणि अलका लक्ष्मण नागणे (५५) अशी या मृत शेतकरी पती-पत्नीची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आंबे गावच्या परिसरात शेती पंपाची वीज पहाटे पावणे पाच वाजता येते. रविवारी रात्रभर परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. पावसामुळे नदीवरील विजेची मोटार बंद करण्यासाठी शेतकरी लक्ष्मण नागणे हे पहाटेच्या सुमारास गेले होते. मात्र, रात्रभर झालेल्या पावसामुळे तिथे वीज प्रवाहाचा बिघाड झाला होता. मोटार बंद करत असताना अचानक लक्ष्मण नागणे यांना विजेचा जोरदार शॉक लागला.
पतीला वाचवताना पत्नीचाही मृत्यू
आपल्या पतीला विजेचा धक्का लागल्याचे आणि ते विव्हळत असल्याचे पाहून पत्नी अलका नागणे या अत्यंत घाबरल्या. पतीचे प्राण वाचवण्यासाठी त्या तात्काळ त्यांच्या दिशेने धावल्या आणि त्यांना बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाऊस आणि ओलाव्यामुळे वीज प्रवाह वेगाने पसरला असल्याने अलका नागणे यांनाही विजेचा तीव्र धक्का बसला. या दुर्दैवी अपघातात काही क्षणांतच शेतकरी पती-पत्नी दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
शासकीय मदतीची मागणी
या घटनेची माहिती मिळताच आंबे गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. एकाच वेळी कुटुंबातील दोन्ही छत्र हरपल्याने नागणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या अत्यंत गरीब शेतकरी दाम्पत्याच्या मागे असलेल्या कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत शेतात काम करताना आणि विजेची उपकरणे हाताळताना शेतकर्यांनी काळजी घेण्याचे आवाहनही स्थानिक प्रशासनाने केले आहे.















